Place: यवतमाळ | Date: 2026-09-23

खेळ मंत्रालय भारत सरकार द्वारा, नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत या विषयावर अमोलकचंद महाविद्यालयाच्या वसंतराव नाईक सभागृहात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी निवासी उपजिल्हाधिकारी, अनिरुद्ध बक्षी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय समन्वयक डॉ. सचिन वानखडे व अध्यक्षस्थानी अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय लाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयीन कार्यक्रम अधिकारी प्रा. शशिकांत राठोड यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची रूपरेखा मांडली. विद्यार्थ्यांनी नशा मुक्त आधारित नाटकाचे सादरीकरण केले. अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय लाड यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना महाविद्यालयात दिल्या जाणाऱ्या शिक्षणासोबत आई-वडिलांचे संस्कार जपा व नशा मुक्त रहा असा संदेश देऊन, विद्यार्थ्यांना नशा मुक्त राहण्याची शपथ दिली त्यानंतर विद्यार्थ्यांनी नशा मुक्त अभियानाच्या स्वाक्षरी मोहीम राबवून आम्ही नशा करणार नाही तसेच युवकांना नशेपासून दूर ठेवू असा निर्धार केला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुचिता वानखडे तर आभार प्रदर्शन डॉ. रुपेश मुद्दलवार यांनी केले.